Thursday 6 October 2016

महाराष्ट्राचे निर्माते , मराठी साहित्याचे पहिले निर्माते आणि मातृसत्ताक संस्कृतीचे पुरस्कर्ते पुरोगामी राजघराणे : सातवाहन

महाराष्ट्राचे निर्माते , मराठी साहित्याचे पहिले निर्माते आणि मातृसत्ताक संस्कृतीचे पुरस्कर्ते पुरोगामी राजघराणे : सातवाहन
(सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावित असत. )
आजचा जो महाराष्ट्र आहे त्याची निर्मिती प्रथम कोणी केली असेल तर ते आहेत सातवाहन. हे सातवाहन (तेलुगू: శాతవాహన సామ్రాజ్యము ; रोमन लिपी: Sātavāhana ;) हे इ.स.पू. २३० ते इ.स. २२० या कालखंडात दख्खनच्या पठारावर राज्य केलेले राजघराणे होते. यांनी सुमारे ५०० राज्य केले असे इतिहासात नमूद केलेलं आहे. यांचे राज्य वर्तमान महाराष्ट्र , कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांच्या भूप्रदेशांत पसरले होते. आंध्र प्रदेशातील धरणीकोट व अमरावती, तसेच महाराष्ट्रातील जुन्नर व पैठण (जुने नाव प्रतिष्ठान ) ही सातवाहनांची प्रमुख ठाणी होती. पैकी पैठण ही सातवाहनांची राजधानी होती असेही दिसून येते. या कारणामुळे इतिहास संशोधक त्यांना महाराष्ट्राचे राजे मानतात. खरा महाराष्ट्र निर्माण करण्याचे कार्य तसेच प्राकृत मराठी निर्माण करण्याचे व मराठी कॅलेंडर शके सुरु केले ते याच घराण्याने.
नाशिक येथील पांडवलेणी ह्या बौद्ध लेणीच्या कोरीवकामात सातवाहन राजांनी कोरीवकामासाठी दान दिले असा उल्लेख येतो. इ.स.पू.च्या पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा ‘सातवाहन’ हा महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश मानला जातो. सातवाहनांच्या राजवटीतच महाराष्ट्रात सुवर्णकाळ होता असेही मानले जाते. प्रतिष्ठान (पैठण), जीर्णनगर (जुन्नर), तगर (तेर), नेवासे, नाशिक अशी भरभराटीला आलेली शहरे या राजवटीत उदयास आली.
सातवाहन राजघराणे :
सम्राट अशोकाच्या वेळेस सातवाहन घराणे हे त्याचे मांडलिक होते. ग्रीक प्रवासी मेगॅस्थेनिसने त्यांच्याबद्दल इंडिका या ग्रंथात लिहिले आहे. त्यात मेगॅस्थेनिस लिहितो, "आंध्रातील हे घराणे अतिशय प्रबळ असून त्यांच्या आधिपत्याखालील सुमारे ३० गावांना कडेकोट बांधलेले किल्ले आहेत. या राजाकडे ११,००,००० चे पायदळ आणि १००० हत्ती आहेत." स्वतः अशोकाच्या राज्यकाळात सातवाहन घराणे अशोकाचे मांडलिक असल्याचे नमूद केलेले दिसते. तसे तर सातवाहन हे पशुपालक होते. मात्र मुळचा हा पशुपालक समाज पुढे सम्राट अशोकाच्या बरोबर सैन्यात काम करू लागला तसेच पुढे स्वतंत्र होऊन त्यांनी राज्यस्थापना केली आणि सुमारे ५०० वर्षांहून अधिक वर्षे राज्य केले. या राजघराण्याची सत्ता आंध्रमधून गोदावरीच्या खोर्‍यात आणि पुढे महाराष्ट्रात आतपर्यंत पसरत गेली. या घराण्याचा उल्लेख मत्स्य पुराणात व वायु पुराणात आला आहे कोण होते हे सातवाहन? पुराणांत त्यांना आंध्र असे म्हटले आहे. ते शूद्र (अवैदिक) वर्णाचे होते असाही उल्लेख पुराणे करतात. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारतातील पुंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. मुळचा हा पशुपालक समाज. महाभारतात औंड्रांना असूर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र समाज दक्षीणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे ऒडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत, यावरुन या समाजाचा व्यापक विस्तार ल्क्षात यावा. मावळालाही "आंदर मावळ" असे म्हटले जाते. "आंदर मावळ" (जुन्नरचा परिसर) आंध्र अथवा औंड्र मावळवरुन बनला असावा. सातवाहनांची पहिली राजधानीही याच प्रदेशात असल्याने हा शब्दही आंध्र-औंड्र याचाच अपभ्रंश असावा असे म्हटले तर वावगे होणार नाही. बौद्ध व जैन संस्कृतीच्या कालखंडांनंतर पैठणमध्ये सातवाहन राजाचे राज्य स्थापन झाले. या राजसत्तेच्या काळात पैठणचा सर्वांगीण विकास झालेला दिसतो. सातवाहन राजे विद्या आणि कलांचे भोक्ते असल्याने देदीप्यमान कलेची व पंडितांची परंपरा इथे सुरू झाली, ती जवळजवळ वसाहतवादी कालखंडापर्यंत टिकून राहिली. सातवाहन राजवटीच्या काळात जगप्रसिद्ध वेरूळ व अजिंठा-वेरूळची लेणी ही बौद्ध लेणी खोदली गेली.
पैठणच्या दक्षिणेला गोदावरीकाठी नागघाटाशेजारी भग्नावस्थेत उभा असलेला सातवाहन राजाचा वाडा आजही या राजवटीची साक्ष देत आहे. त्या काळातील नगररचना ही सर्व सोयींनी युक्त अशी होती. विविध नमुन्याच्या पक्क्या भाजलेल्या विटा , छपरावर टाकण्यासाठी पन्हाळी कौले, भूमिगत गटार-योजना, कोरीव नक्षीची कामे, अशा सुविधांनी ही नगररचना आदर्श होती. गनिमी काव्याने युद्ध कसे करायचे याचे तंत्र देखील याच कालखंडात जास्त प्रचलित झाले होते. यामध्ये प्रामुख्याने गौतमीपुत्र सातकर्णी यांनी त्याचा वापर करून आपल्या शत्रूला परास्त केले आणि प्रजेची कायम रक्षा केली.
महापराक्रमी गौतमीपुत्र सातकर्णी :
याच सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा तेवीसावा राजा अतिशय पराक्रमी होता. त्याच्या पित्याचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री असे होते. सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावित असत. गौतमी ही सातकर्णीची आई होती. म्हणूनच त्याचे नाव गौतमीपुत्र सातकर्णी असे होते. नाशिकजवळ गोवर्धन येथे सातकर्णी व शकांमध्ये तुंबळ लढाई झाली. यात शकांचा राजा नहपान हा मृत्युमुखी पडला. सातकर्णी विजयी झाला. त्याने या प्रदेशात पुन्हा एकदा सातवाहनांचे वर्चस्व प्रस्थापित केले याच्या कार्यकाळात सातवाहन राज्याने भरभराटीचा कळस गाठला होता.
नाशिकजवळ बौद्धलेणी आहेत. या लेण्यांमध्ये सातकर्णीविषयीची माहिती मिळते. सातकर्णी याचा उल्लेख येथील लेखांत वेदांचा व ब्राह्मणांचा आश्रयदाता असा केला आहे. सातकर्णी वैदिक धर्माचा पोषक असूनही तो अत्यंत धार्मिक व सहिष्णू होता. बौद्ध धर्माच्या बाबतीत तो अतिशय उदार होता. बौद्धांच्या तत्कालीन संघांना त्याने बरीच मदतही केली होती. मुंबईजवळील कार्ले येथी बौद्ध संघालाही त्याने करजक नावाचे गाव दिले होते. तसेच सुप्रसिद्ध नाणेघाट यांच्याच शासन काळात घडवला गेला. एका समकालीन कविच्या अनुसार प्रुथ्वीला दोन भार वहावे लागतात उत्तरेला हिमालयाचा आणि दक्षिणेला सातवाहनांच्या पराक्रमाचा.
शकांचे दमन करणारा शालिवाहन (सातवाहन) गौतमीपुत्र सातकर्णी असा त्याचा उल्लेख सापडतो. त्यामुळे शालिवाहन शकाचा प्रारंभ त्याच्या जीवनकाळात झाला. त्याचा कार्यकाळ इसवी सन १०६-१३० असा मानला जातो. इसवी सन ७८ पासून हे शालिवाहन शक सुरू झाले. पण गौतमीपुत्र सातकर्णीच्या शासनकाळाशी ही तिथी जुळत नाही. त्यामुळे त्याच्या जन्मापासून हे संवत सुरू झाल्याचे मानले जाते. याने चातुवर्ण्यसंकर बंद केला व बौद्ध धर्मास उदार आश्रय दिला. (सौजन्य : साभार मराठी विकेपिडीया)
( आता काही जातिवंत यांची जात शोधतील आणि त्यांना त्यांच्या जातीशी जोडण्याच्या प्रयत्न करतील तसेच ते आमच्या जातीचे होते असे मिरवण्यास त्यांना सोईचे होईल. मात्र त्यांनी जे कार्य केले आणि योजना राबवल्या , चांगला राज्यकारभार केला त्याचा मात्र आदर्श घेणार नाहीत आणि तसे आचरण देखील करणार नाहीत.)
विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१