Friday 2 September 2016

शेतकऱ्यांचे शेतमालाला शाश्वत भाव कधी मिळेल..

शेतकऱ्यांचे शेतमालाला शाश्वत भाव कधी मिळेल..

शेतकरी आणि ग्राहक ने नेहमी दुखी दिसतात. याचे कारण म्हणजे भाव पडले तर शेतकरी दुखी होतात त्यावेळी बाजारतात शेतमाल एकदम स्वस्त असतो त्यावेळी ग्राहक खुश असतो. पण शेतमालाची कमतरता झाली कि भाव वाढतात मग त्याचा फायदा शेतकर्यांना थोड्या प्रमाणात होतो मात्र ग्राहक त्यामुळे दुखी होतात. आता हे दोन्ही घटक आनंदी ठेवण्यासाठी तसेच शेतमालाचे बाजार भाव कायम स्थिर राहण्यासाठी नेमके काय केले पाहिजे याचा विचार केला पाहिजे. दोघांना म्हणजे शेतकरी आणि ग्राहक यांना विन-विन परिस्थिती कशी निर्माण होईल यासाठी आता प्रयत्न होणे गरजेचे आहे.
असंघटीत शेतकरी हा संघटीत झाला पाहिजे व कधी काय पिकवायचे आणि कोठे विकायचे याचे नियोजन झाले पाहिजे तरच शेतकर्यांना फायदा होऊ शकतो. जो शेतकरी समूह, शेतकरी उत्पादक कंपनी यामध्ये सहभागी नाहीत्यांना त्रास होणार आहे त्यामुळे अश्या असंघटीत शेतकर्यांना आपल्या शेतीचे नियोजन आणि शेतमाल साठवणूक, विक्री, प्रक्रिया याचे नियोजन जमत नसल्याने त्याला फायदा होताना दिसत नाही. तसेच इकडे ग्राहकांना कधी स्वस्तात तर कधी एकदम महागात धान्य, भाजीपाला घ्यावा लागतो त्यामुळे सगळे नियोजन ढासळून जाते. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घेऊन शेतकरी बाजार चालू करणे व त्यामधून शेतमाल विक्री करण्याकडे वळले पाहिजे तसेच शेतीपूरक व्यवसाय उभारणे आवश्यक आहे. आपल्या गाव-खेड्यात शेतमालावर प्राथमिक व द्वितीय प्रक्रिया होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
शहरात आज मला कांदा रु. २०/ प्रती किलो तर इतर भाज्या रु. ३० प्रती किलो याच दराने वर्षभर राहिल्या तरी अडचण नाही. मात्र थोड्या प्रमाणात चढ-उतार झाले तर चालतील पण जास्त बदल झाले तर नियोजन कोलमडून जाते. त्यामुळे भाजीपाला साठवणूक करणे, तसेच भाजीपाल्यावर निर्जलीकरण ( सोलर ड्रायर) च्या सहाय्याने करून त्याची विक्री करण्याचे पर्याय आहेत.जास्तीचे उत्पादन होते त्यावेळी शेतमाल प्रक्रिया होणे हि काळाची आणि शेतकऱ्यांची गरज आहे. एकतर शेतीचे होणारे तुकडीकरण शेतीला मारक असताना शेतकर्यांना जर जगण्यासाठी आवश्यक उत्पादन आणि पैसा उपलब्ध झाला नाहीतर त्याचे पुढे कर्ज काढणे व त्याची पूर्तता झाली नाहीतर आत्महत्या करणे हेच पर्याय राहत असतील तर हा आमच्या व्यवस्थेचा पराभव नाही का ?? त्यामुळे आता शेतीमध्ये आम्हाला बदल करावे लागतील आणि बाजाराच्या गरजा बघून तसे उत्पादन, साठवणूक आणि प्रक्रिया याकडे वळले पाहिजे. यासगळ्या बाबी घडवण्यासाठी आता शेतकर्यांना एकटे राहून व स्वतंत्रपने शेतमाल पिकवून किंवा एकट्याने विकून जमणार नाही तर त्यासाठी संघटीत होऊन बाजाराची लढाई आता लढावी आणि जिंकावी लागेल.
बाजाराची लढाई लढणे तसे सोपे नाही हे मान्य कारण आजच्या सगळ्या बाजार समित्या किंवा बाजार पेठ हि व्यापारी नियंत्रित झाली आहे. त्यामुळे समूह शेती आणि शेतकरी उत्पादक कंपन्या यांचे मार्फत स्वतंत्र व पर्यायी बाजार व्यवस्था निर्माण करण्याची आज गरज निर्माण झाली आहे तसेच सध्याच्या सरकार चे धोरण या उपक्रमास उपयुक्त असेच आहे. आता फक्त शेतकऱ्यांचे नावाने गळे काढणारे आणि सहानभूती दाखवणारे ग्राहक, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते यांनी शेतकरी मित्रांना शहर, ग्रामीण भागात शेतमाल थेट खरेदी करून सहकार्य करावे तसेच शेतकर्यांना आता विनंती करावी वाटते कि तुम्ही आता एकटे राहणे सोडून द्या म्हणजे तुमचा फायदा होईल. तसेच सरकार ला विनंती कि एकट्याला मिळणाऱ्या योजना आणि अनुदान कमी करावे कारण त्याचा लाभ घेणारे नेमके कोण आहेत हे आता समोर आलेले आहे. त्यामुळे आगामी काळात योजना , मिशन किंवा आपले धोरण हे शेतकरी समूह, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी संस्था यानाच समोर ठेऊन करावे. यामुळे शेतकरी एकत्र येईल , संघटीत होऊन नियंत्रित शेती करेल ज्यामुळे उत्पादन, विक्री, प्रक्रिया याचे योग्य गणित साधून शेतकर्यांना फायदा होईल, शेतकरी वाचेल,

विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१